बालविवाह मुक्त देशासाठी आपणही सर्वांनी सक्रिय व्हावे :रामकृष्ण माने
करमाळा : बालविवाह मुक्त समाज होणे ही काळाची गरज आहे. बालविवाह ही मोठी गंभीर समस्या आहे. आपला देश बालविवाह मुक्त होण्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थ हे प्रभावी मोहीम राबवित आहेत. बालविवाह मुक्त देशासाठी आपणही सर्वांनी सक्रिय व्हावे. असे मत आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने यांनी व्यक्त केले.
कैलास सत्यार्थ चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली, महात्मा फुले समाजसेवा मंडळ, अभिनव भारत समाजसेवा मंडळ, एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ऑक्टोबर २०२३ रोजी बालविवाह मुक्त भारत अभियान हा उपक्रम एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा येथे राबविण्यात आला.
यावेळी आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे हे मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद झिंजाडे म्हणाले की, बाल शिक्षण व बालकांचे हक्क यासाठी केलेल्या कामामुळे कैलास सत्यार्थ यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार रकमेतून कैलास सत्यार्थ फाउंडेशनची स्थापना करुन बालविवाह मुक्त भारत अभियान ते राबवित आहेत. २०३० पर्यंत देशातील बालविवाह प्रथा संपविणे हा उद्देश असून बालविवाहामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी आश्रम शाळेतील कर्मचारी, विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत अभियानात सहभागी होण्याची शपथ घेत तशी शपथपत्रे भरून दिली. तसेच या निमित्ताने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालविवाह मुक्त भारत या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक आणि सन्मानपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, सहशिक्षक भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, कुमार पाटील, प्रल्हाद राऊत, शिक्षिका विद्या पाटील, अधीक्षक बाळासाहेब शिंदे, कविराज माने, उमेश गायकवाड, सैदास काळे, वदंना भालशंकर, दिपाली माने, सोमनाथ काळे आदिंसह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.