विधवा प्रथा निर्मूलन कार्यासाठी, प्रमोद झिंजाडे यांचा ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ पुरस्काराने सन्मान : प्रशांत कोठाडिया
करमाळा (जि. सोलापूर) येथील ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळा’चे संस्थापक व अध्यक्ष श्री. प्रमोद झिंजाडे यांनी सुरू केलेल्या ‘विधवा प्रथा निर्मूलन कार्या’साठीचा अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ – २०२२ हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक श्री. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. राजीव भालेराव आणि ज्येष्ठ सदस्य शोभा चित्रे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘मासूम’ संस्था आणि ‘साधना ट्रस्ट’ या संस्थांनी मिळून हा समारंभ आयोजित केला होता. या पुरस्काराबद्दल झुंजार कार्यकर्ते श्री. प्रमोद झिंजाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांच्या बहुआयामी कार्याचा थोडासा परिचय.
—————————————————————
स्वयंसेवी क्षेत्रामध्ये श्री. प्रमोद झिंजाडे यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी १९८२ मध्ये आपल्या पोथरे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे सुरू केलेल्या ‘महात्मा फुले समाज सेवा मंडळ’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्वांगीण ग्रामीण विकासाचे कार्य सुरू करून, या पंचक्रोशीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. दुष्काळी तालुका म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या या परिसरातील अनेक गावांमधून पाणलोटक्षेत्र विकासाचे प्रकल्प यशस्वी करून, प्रमोदने गावक-यांच्या मनात हिरवी स्वप्नेही पेरली.
तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांची परिस्थिती
महात्मा फुले, क्रांतिजोती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, आदी समाजसुधारकांच्या विचारांनी पूर्णपणे भारावलेला प्रमोद मागील ४० वर्षांहून अविरतपण कार्य करत असूनही एका महत्त्वाच्या समस्येमुळे खूप अस्वस्थ होता. गावागावातील आणि शहरातील मिश्र वस्त्यांमधून बहुजन समाजातील महिलांची विदारक स्थिती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आजही, तथाकथित पुरोगामी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात एकल महिलांना, विशेषतः वैधव्य आलेल्या स्त्रियांना ज्या अपमानास्पद, तिरस्कारपूर्ण आणि टिंगलटवाळीच्या वागणुकीला तोंड द्यावे लागते, या कल्पनेने प्रमोदच्या मनाला चटके बसत होते. वैधव्याचे रखरखीत जगणे नशिबी आलेल्या महिलेने कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी समारंभात जाऊ नये, रंगीत कपडे घालू नये, हे कमी म्हणून की काय, तिच्या चेह-यावर हास्याची रेघही उमटायला नको, अशी एक ना अनेक बंधने तिच्यावर वर्षानुवर्षे घातली गेलेली आहेत. अशातच, कोविड महामारीने देशातील अक्षरशः कोट्यवधी आयाबहिणींना जणू एक वेगळेच अग्निदिव्यच करायला भाग पाडले. कोरोना विषाणुंच्या लागवणीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पुरूषमंडळींचे असंख्य संसार उघडे पडले आणि त्यामुळे विधवा झालेल्या महिला भयावह परिस्थितीत ढकलल्या गेल्या. मात्र या क्रूर प्रथेविरूद्ध बोलण्याची पुरूषमंडळींची हिंमत होत नसावी किंवा याबद्दल मौन धारण करणे हे कदाचित तथाकथित समाजाला सोयीचेही वाटत असावे.
या पार्श्वभूमीवर, दोन वर्षांपूर्वीच्या एका घटनेने झिंजाडे यांच्या आयुष्यला एकप्रकारे कलाटणी दिली. ११ जून २०२० रोजी, श्री. प्रमोद झिंजाडे हे सांगली जिल्ह्यात एका कार्यकर्त्याच्या अंतिम संस्काराला गेले होते. चितेला अग्नी देऊन काही क्षण होतात न होतात, इतर विधवांनी त्या कार्यकर्त्याच्या पत्नीचे कुंकू पुसत तिच्या अंगावर जे काही तुटपुंजे दागिने होते ते देखील काढायला सुरूवात केली. ती हमसून हमसून रडत होती, ओरडत होती, पण या जुन्या प्रथेपुढे कोणाचे काय चालणार? आपल्याकडे एकवेळ रेड्याच्या मुखातून वेदोच्चार बाहेर पडेल, परंतु स्रियांच्या दुःखाबद्दल ब्र देखील ऐकू येणार नाही, अशी सर्वसाधारण परिस्थिती. पुढील काही मिनिटातच तिच्या वैवाहिक जीवनाचे सारे रंगच पुसून टाकला गेला आणि तुला आता बेरंगी आयुष्य जगावे लागेल, असा संदेशच जणू तिला देण्यात आला. काहीही चूक नसलेल्या एका दुःखी महिलाचा आक्रोश ऐकून झिंजाडे यांच्या मनात कालवाकालव होणे स्वाभाविकच होते. हृदयात वेदनेची कळ उमटली, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याच क्षणी प्रमोद झिंजाडे यांनी, ही अन्यायी व क्रूर प्रथा बंद व्हायलाच हवी, असे मनोमन पक्के केले. लोकांचे पुन्हा एकदा प्रबोधन करून त्यांच्यामध्ये या अनिष्ट प्रथेविरोधात जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे झिंजाडे यांना जाणवले. मात्र केवळ प्रबोधन व जागृती करून भागणार नाही, तर या प्रथेविरूद्ध कायदेशीर बाबींचाही शासकीय पातळीवरून पाठपुरावा करणे किती महत्त्वाचे आहे, हे पण त्यांच्या लक्षात आले.
*विधवा प्रथा निर्मूलन अभियानाची मुहूर्तमेढ :*
दरम्यान कोविडच्या महामारीचे थैमान सुरू झाले. कोविडच्या या आव्हानात्मक काळात झिंजाडे यांना, राज्यातील विविध ठिकाणी गोरगरीब कष्टक-यांना अन्नधान्य व इतर आवश्यक वस्तुंचा वाटप करण्याची मोहीम प्राधान्याने हाती घ्यावी लागली. कोरोनाचे संकट ओसरल्यावर मात्र झिंजाडे यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान’ या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आणि आपल्या नव्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीस प्रारंभ केला. सद्यपरिस्थितीत ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’च्या माध्यमातून विद्वेष पसरविण्याचा जो नंगा नाच सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांचा विधायक कार्यासाठीही वापर करता येतो, याचे झिंजाडे यांनी जणू उदाहरणच समाजापुढे ठेवले. या व्हॉट्सॲप गटामध्ये राज्यातील सरपंच, सामाजिक संस्था, बचत गट, शासकीय अधिकारी यांचा समावेश केला आणि ही अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करणे किती गरजेचे आहे, हे पटवून देण्यासाठी या गटातील सभासदांशी संवाद सुरू केला.
कृतीशील प्रमोदने घालून दिले स्वतःचे उदाहरण :
प्रमोद झिंजाडे हे मूळातच कृतीशील कार्यकर्ते असल्यामुळे, त्यांनी स्वतःच एक उदाहरण घालून देण्याचे ठरवले. या पारंपरिक अनिष्ट रुढीच्या बंधनातून स्वतःला पत्नीला मुक्त करण्याचा झिंजाडे यांनी मनोमन निश्चय केला आणि त्या दृष्टीने, ‘माझ्या मृत्युपश्चात माझी पत्नी श्रीमती अलका झिंजाडे हिच्यावर या प्रकारच्या अवमानकारक रुढी, परंपरा लादू नयेत, तिचे कुंकू पुसून टाकू नये, तिच्या बांगड्या काढू नये आणि कोणत्याही प्रकारे तिचे विद्रुपीकरण करू नये’, असे शंभर रुपयांच्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र तयार केले. दि. २९ मार्च २०२२ ला हे प्रतिज्ञापत्र शासन दरबारी सादर करून झिंजाडे यांनी एका विधायक चळवळीची आशादायी मुहूर्तमेढ रोवली.
‘विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियाना’चा प्रवर्तक असलेल्या झिंजाडे यांनी या विषयावर ग्रामीण भाग पिंजून काढायचे ठरवले. त्यादृष्टीने प्रमोदने राज्यातील सरपंचांशी पत्र, व्हॉट्सऍप, पत्रकं, या माध्यमातून संवाद सुरू केला. २०१९ मध्ये कोल्हापूर व सांगली परिसरात आलेल्या पूरामध्ये मदत कार्य करत असताना, त्यांची ओळख कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या गावचे सरपंच श्री. सुरगोंडा पाटील यांच्याशी ओळख झाली होती. या भेटीत, झिंजाडे यांनी विधवा प्रथा निर्मूलन कार्याविषयी सूतोवाच केलेच होते. मात्र पुढील काही महिन्यातच कोविड महामारीसारखे संकट येईल, याची कोणाला कल्पना असणार? देशभराप्रमाणेच हेरवाड गावातील जवळपास वीस महिलांना वैधव्य आल्यामुळे, त्यांना जे भोगावे लागत होते हे श्री. सुरगोंडा पाटील यांनी देखील प्रत्यक्षात पाहिले होते. याच जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. राजू मगदूम हे देखील झिंजाडेंच्या विचाराने प्रभावित झाले होते आणि त्या दोहोंच्या मनातही या अनिष्ट प्रथेविरूद्ध आपल्या गावात कार्य सुरू करण्याचा विचार घोळतच होता.
हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींचा पुढाकार :
याच दरम्यान, हेरवाड गावाच्या पंचक्रोशीत वसलेल्या अर्जुनवाड या गावातील श्रीमती अंजली पैलवान या तरूण महिलेवर विधवा होण्याचा दुर्दैवी प्रसंग गुदरला. श्रीमती अंजली पैलवान यांनी झिंजाडे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हां त्यांना मार्गदर्शन करताना झिंजाडे यांनी ‘आपण स्वतचे उदाहरण घालून द्या’ असे सुचवले. त्याचा परिणाम म्हणून, अंजलीबाईंनी पुढाकार घेत हळदी-कुंकूचा समारंभ आयोजित केला आणि दागदागिने परिधान करून सण साजरे करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या या धाडसाचे दबक्या आवाजात का होईना, गावात थोडेफार कौतुकही झाले.
वरील सर्व परिस्थितीचा परिपाक म्हणजे, हेरवाड ग्रामपंचायतीने (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘विधवा प्रथा निर्मूलना’चा ५ मे २०२२ रोजी एकमताने ऐतिहासिक ठराव मंजूर केला. हेरवाड ग्रामपंचायतीने उचललेल्या या पावलाची देशभरातील सर्व भाषिक वर्तमानपत्रांनी दखल घेतल्यामुळे याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्या पाठोपाठ माणगाव (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीनेही अशाच प्रकारचा ठराव मंजूर केला. कोल्हापूर जिल्हा परिषदेने या ठरावांचे समर्थन करणारे एक परिपत्रकही जारी केले. शासकीय पातळीवरही त्याची तातडीने दखल घेतली घेतली गेली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. श्रीमती नीलम गो-हे यांनी या प्रथेविरूद्ध कायदा झाला पाहिजे, ही झिंजाडे यांची भूमिका उचलून धरली आणि शासनाकडे यासाठी आग्रह धरण्याचे डॉ. नीलम गो-हे यांनी जाहीर केले.
झिंजाडे यांच्या ग्रामविकास कार्यास लाभले नवे परिमाण
मागील चाळीस वर्षांपासून, रोजगार हमी योजनेची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून झटणा-या झिंजाडे यांच्या भरीव कार्याला, ‘विधवा प्रथा निर्मूलन अभियाना’मुळे एक वेगळेच परिमाण लाभले आहे. जमिनीवर घट्ट पाय रोवून असलेल्या झिंजाडे यांनी ठिकठिकाणी राबविलेल्या पाणलोटक्षेत्र विकासाच्या ‘पाणीदार’ प्रकल्पांमुळे करमाळा सारख्या दुष्काळी भागातील शेती पिकू लागली आणि अक्षरशः हजारो जिरायती शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रातून कायमचे बाहेर आले आहेत. उपजीविकेसाठी कायम भटकंती करणा-या अनुसूचित जाती व भटक्या जमातीतील विशेषतः पारधी जमातीच्या कुटुंबांचे पुनर्वसन आणि त्यांच्या मुलामुलींना कौशल्यांवर आधारित प्रशिक्षण देण्याच्या झिंजाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या पंचक्रोशीतील भटक्या व विमुक्त समाजाच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले आहे.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने या अभियानात सहभागी व्हावे म्हणून श्री. झिंजाडे पायाला भिंगरी लावून सर्वदूर फिरत आहेत, लोकांशी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. त्याच बरोबर, याबाबत कायदा व्हावा म्हणून ते शासनालाही साद घालत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून झिंजाडे यांनी कायद्याचे मसुदास्वरूप प्रारूपही तयार केले असून, हा कायदा व्हावा म्हणून ते शासन दरबारी न थकता पिच्छा पुरवत आहेत. राजर्षी छत्रपती श्री. शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षात, श्री. प्रमोद झिंजाडेसारख्या, १९८२ पासूनच मित्र असलेल्या, मित्राने सुरू केलेल्या या महत्त्वपूर्ण व अभिनव अभियानास हृदयपूर्वक शुभेच्छा देत असताना, वैधव्याचे भोग वाट्यास आलेल्या आयाबहिणींना ‘माणूस’ म्हणून जगण्यास बळ देणा-या त्यांच्या अतुलनीय कार्याला सलाम.!